लॉकडाऊन मधील तंत्रस्नेही विद्यार्थ्याची न संपणारी गोष्ट     संगणक शिक्षण ही काळाची गरज असून सध्याच्या पिढीला लहानपणापासूनच नवनवीन गोष्टी, नवनवीन तंत्रज्ञान जाणून घेण्याची, शिकण्याची सर्रास आवड असलेली आपल्याला दिसून येते. हे ज्ञान लहानपणीच मुलांना दिले तर संगणक हाताळताना मुलांना भीती वाटणार नाही. 
      सन 2019/20 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान देण्यासाठी मुख्याध्यापक भामिनी पाटील व सहकारी शिक्षक यांच्या प्रेरणेतून काम सुरु केले. संगणक बंद अवस्थेत होता. तो स्वतः दुरुस्त करून चालू केला. यानंतर शालेय वेळेच्या आधी किंवा दुपारी जेवणाच्या सुट्टीतील फावल्या वेळेत इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंत गटागटाने बोलवून संगणकाचे प्राथमिक ज्ञान देण्याचे ठरवले. माझ्याकडे पाचवीचा वर्ग होता. त्यामुळे माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना सुरवातीला मी संगणकाची ओळख करून दिली. मुले हळूहळू चित्रे रेखाटन करत रंगवू लागली. त्यांनी प्रत्येकाचा फोल्डर बनवला व त्या फोल्डर मध्ये प्रत्येकांनी आपापली चित्रे जतन करुन ठेवली. 

      मी सुरवातीला माझ्या वर्गाला शिकवले. पण इतर वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मला वेळ द्यावा लागला नाही. कारण माझ्या पाचवीतल्या मुलांनीच इतर वर्गातील मुलांना शिकवण्यास सुरवात केली.यासाठी काही दिवस ज्यादा तास व सुट्टीचा वेळ देखील दिला.ज्या विद्यार्थ्यांना माऊसला हात लावायला भीती वाटत होती, अशा पाचवी ते सातवीमधील जवळपास 60% विद्यार्थी संगणक हाताळू लागले. ही तर सुरुवात होती. कालांतराने मार्च महिन्यात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात आमच्या शाळेला कुंडलवाडी गावातील डॉ. संदीप कदम यांनी प्रिंटर भेट दिला. दुसर्‍याच दिवशी प्रिंटर संगणकाला जोडून रंगीत प्रिंट प्रात्यक्षिक पाहिले. दोन दिवसांत माझ्या वर्गातल्या मुलांना जवळ बोलावून  PDF प्रिंट कशी काढायची,हे शिकवले. अचानक आठ दिवसांत कोरोना संकटामुळे शाळा बंद झाल्या. 
          त्यानंतर काही दिवसांनी मुख्याध्यापकांसोबत सुधाकर पाटील व वसंत पाटील हे सहकारी शिक्षक शाळेत तांदूळ वाटप करण्यासाठी आले असताना मी माझ्या विद्यार्थ्यांला मास्क वापरुन शाळेत जाण्यास सांगितले. प्रितम सुतार याने आबुजर या वर्गमित्राला सोबत घेऊन शिक्षकांच्या समवेत संगणक व प्रिंटर सुरू करुन रंगीत प्रिंट सोडल्या. त्यावेळी आलेल्या अडचणी फोनवरुन दूर केल्या. कारण लॉकडाऊन मुळे मी गावी अडकलो होतो. 

          प्रिंटर चालू स्थितीत ठेवण्यासाठी प्रिंट सोडणे आवश्यक होते. त्यामुळे प्रितम दर शुक्रवारी किंवा शनिवारी मास्क वापरत शाळेत आईसोबत जाऊन मुलांनी रेखाटलेल्या चित्रांच्या तीन-चार रंगीत प्रिंट काढून त्याचे फोटो मला व्हाॅट्सप करत होता. काल तर त्याने सर्व चित्रे प्रिंट काढून संपली म्हणून स्वतःचे नाव डिझाईन करुन प्रिंट सोडले. खरंच मनाला खुप समाधान वाटले.त्या मुलाने शाळेचा दहा हजार चा प्रिंटर बंद पडण्यापासून वाचवलाय.
          हल्लीची मुलं तंत्रज्ञान स्विकारताना इतकी फॉरवर्ड आहेत की, काहीवेळा शिक्षक, पालक देखील कमी पडतात. त्यांना नवीन शिकण्याची आवड असते. तंत्रज्ञानाची जादू अशी आहे की, संगणकीय ज्ञान लहानपणीच घेतल्याने एखाद्या मुलाचे भावी करिअर देखील घडू शकेल. पण तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक दृष्टिकोनातून,योग्य वेळी कसा करावा हे विद्यार्थ्यांना लहानपणी अंगी बाणवले तर भावी पिढी नक्कीच आदर्शवत घडेल. 
©️ लेख -
प्रविण दत्तात्रय डाकरे
प्राथमिक शिक्षक 
जि.प. शाळा कुंडलवाडी ता.वाळवा, जि.सांगली

Post a Comment

2 Comments

  1. सर,कोणत्या शब्दात तुमचे अभिनंदन करावे तेच कळत नाही.तुम्ही फक्त इ-शैक्षणिक साहित्य पुरवत नाही तर,आमच्या सारख्या लाखो शिक्षकांना आपल्या कार्यातून प्रेरणा देत आहात.तुमच्या कार्य आणि कर्तुत्वाला सलाम.-भाऊ कांबळे,विद्या मंदिर किसरूळ,ता.पन्हाळा,जि.कोल्हापूर.

    ReplyDelete
  2. खुप धन्यवाद सरजी..

    ReplyDelete