सर, शाळा कधी सुरु होणार?


         विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचे शासन आदेश आल्यानंतर शाळेकडे मुले यायची बंद झाली. काही दिवसानंतर शिक्षकांनाही वर्क फ्रॉम होम चे आदेश आले. नुकताच गावी आलो होतो. पण घरी अंतर्मन स्वस्थ बसू देत नव्हते. न दिसणारा विषाणू आपली ताकद आजमावू पाहत आहे, यावर विश्वास बसत नव्हता. कोरोना व्हायरसच्या या वाढत्या प्रभावामुळे जगभर थैमान माजलंय. हजारो प्राण जाताहेत. सोशल डिस्टन्सिंग ओळखून महाराष्ट्रात देखील सर्व कंपन्या, कार्यालये, वाहतूक बंद झाली अन् सुरू झाला कोरोनाशी लढा.. या व्हायरसचा सामना करण्यासाठी प्रशासनाबरोबरच डॉक्टर्स,नर्स,पोलीस,अधिकारी वर्ग, शिक्षक, अंगणवाडी ताई, ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद या सर्वच ईश्वररुपी यंत्रणा दिवस-रात्र या संकटांशी चार हात करताहेत.           
   महाराष्ट्रातील सर्व ज्ञानमंदिरे कुलूपबंद पाहून मनाच्या विचार पटलावर अनेक शंकाकुशंका विराजमान आहेत. मुलांनी अभ्यासाला लॉक केले नसेल ना? मुलांना शाळेचा विसर तर पडणार नाही ना? घेतलेले ज्ञान विसरणार तर नाहीत ना? त्यांच्या मनात घराबाहेर पडण्याची भीती तर नाही ना? शाळा सुरू झाल्यानंतर मुले शाळेत येतील ना? अशा एक ना अनेक प्रश्नांचे काहूर माजले आहे. शासनाने दिलेली ही सुट्टी नसून आपल्या हितासाठी, आपल्या जीवासाठी, कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी घरी सुरक्षित राहण्याचे आदेश शासनाने दिलेला आहे हे प्रत्येकानं लक्षात घ्यायला हवं.           

    कसेबसे दहा-बारा दिवस गेले असतील. शाळेबद्दल आवड व शिकण्याची जिद्द असणारी मुले गप्प कशी बसतील? मुलांचे फोन यायला सुरुवात झाली. सर, शाळा कधी सुरू होणार? घरी बसून कंटाळा आलाय. आम्हाला तुम्ही कंप्यूटर शिकवणार होता ना? लेझीम प्रकार बसवायचे होते ना? आम्ही अभ्यास कसा करायचा? आमच्या परीक्षा कधी होणार? त्यांच्या या निरागस प्रश्नांसाठी मी निरुत्तर होतो. कारण हे कोरोनाचं भयाण संकट केव्हा दूर होईल, अन् शाळा कधी सुरू होईल याची शाश्वती नव्हती.            
   पण या मुलांना अभ्यासात गुंतवून ठेवले तर त्यांचा कंटाळा निघून जाईल व अभ्यास देखील होईल, हा विचार मनात आला अन् लॉकडाऊन मध्ये 'स्टडी फ्रॉम होम' हा एक भन्नाट उपक्रम सुचला. या उपक्रमाचे स्वरूप म्हणजे विद्यार्थ्यांच्या पालकांचे व्हाट्सअप ग्रुप अथवा ब्रॉडकास्ट ग्रुप करून त्यांना दररोज सकाळी ग्रुपच्या माध्यमातून अथवा वैयक्तिक मेसेज पाठवून प्रत्येक इयत्तेचा अभ्यास पाठवायचा. सर्व इयत्तांचा अभ्यास बनवून पाठवणे एकट्याला शक्य नव्हते. पण हा प्रश्न चुटकीसरशी सोडवला तो महाराष्ट्रातील माझ्या सर्व तंत्रस्नेही शिक्षक बांधवांनी..                 
   महाराष्ट्र शासनाचे दीक्षा ॲप महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये वापरले जात आहे. या सर्वसमावेशक ॲप मध्ये सर्व इयत्तांचा अभ्यासक्रम व्हिडीओ स्वरुपात उपलब्ध असून तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने हे सर्व शैक्षणिक साहित्य सर्व शाळांना, शिक्षकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहे. SCERT तर्फे 'शाळा बंद..पण शिक्षण आहे' ही अभ्यासमाला नियमित सुरू आहे. प्राथमिक शिक्षण विभाग,जिल्हा परिषद सांगली देखील विद्यार्थ्यांचे 'ऑनलाईन स्वयंमूल्यमापन चाचणी' हा अभिनव प्रयोग राबवत आहे. तसेच हजारो शिक्षक स्वतः प्रत्येक घटकांवर शैक्षणिक व्हिडिओ बनवत आहेत, पाठानुरुप व स्पर्धात्मक ऑनलाइन टेस्ट बनवत आहेत, PDF बनवत आहेत, अनेक शैक्षणिक ॲप्स विकसित केलेले आहेत. हे सर्व शैक्षणिक ज्ञानभांडार नेहमी विद्यार्थ्यांपर्यंत पाठवले तर शिक्षण प्रक्रिया ही लॉकडाऊन मध्ये देखील निरंतर सुरु राहील ही शाश्वती होती.           
   या नियोजनानुसार विद्यार्थ्यांना दररोज सकाळी अभ्यास पाठवण्यास सुरुवात केली. सक्ती न करता त्यांच्या वेळेनुसार सराव करण्यास सांगितले. आम्ही दोघांनी (प्रविण डाकरे व बंधू जयदीप डाकरे) इयत्ता पहिली ते पाचवीसाठी नियमित दहा ते पंधरा ऑनलाईन टेस्ट बनवण्याचे ठरवले. त्यानुसार नियमित अपडेट आम्ही आमच्या www.gurumauli.in या संकेतस्थळावर टाकण्यास सुरुवात केली. आम्ही बनवलेल्या टेस्ट आमच्या विद्यार्थ्यांबरोबरच महाराष्ट्रातील इतर शाळांतील विद्यार्थ्यांनाही त्याचा उपयोग व्हावा म्हणून आम्ही वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शेअर करत राहिलो. महिनाभरात जवळपास सव्वा चार लक्षहून अधिक भेटी संकेतस्थळाला कधी झाल्या हे समजलेच नाही. कारण दिवसाला हजारो विद्यार्थी ब्लॉगवर ऑनलाईन टेस्ट सोडवत होते. 'स्टडी फ्रॉम होम' हा उपक्रम खरोखरच यशस्वी झाला होता. कारण सोडवलेल्या विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स आमच्याकडे गुगल फॉर्म च्या सहाय्याने नोंदवले जात होते. खंत याच गोष्टीची होती की,ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे स्मार्टफोन नाहीत, अशा विद्यार्थ्यांना या उपक्रमापासून अलिप्त व्हावे लागत होते. पण अशा विद्यार्थ्यांना बाजूच्या घरी फोन करून, एकमेकांना निरोप देऊन अभ्यास काय काय करायचा हे सांगण्यात आले व त्यांनाही या प्रक्रियेत सामील करण्यात आले.            
    लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांची सध्याची मानसिकता काय असेल हे ओळखणे कठीण आहे. कारण अजूनही शाळा सुरू नसून कधी सुरू होईल याची देखील कल्पना नाही. सध्यातरी मुलांची खरी परीक्षा ही कोरोनाविरुद्ध लढण्याची आहे. प्रयत्न हाच आहे की, शिक्षण ही प्रक्रिया निरंतर सुरू राहावी, त्यात खंड न पडता सातत्य रहावे. यासाठी आपले शासन,आपली जिल्हा परिषद सर्वच स्तरावरून 'लर्निंग फ्रॉम होम' च्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे.शेवटी एवढंच म्हणेन -      
     घरी सुरक्षित राहून,कोरोनाचे करुया भक्षण,
         'स्टडी फ्रॉम होम' ने निरंतर ठेवू शिक्षण..!

लेख -प्रविण दत्तात्रय डाकरे
प्राथमिक शिक्षक
जि.प. शाळा कुंडलवाडी ता.वाळवा, जि.सांगली


Post a Comment

0 Comments

सध्या ब्लॉग डिझाईन चे काम सुरु आहे. लवकरच परिपूर्ण ई-साहित्य उपलब्ध होईल.