सध्या (आजचा अभ्यास - शाळापूर्व तयारी)उपक्रम अंतर्गत पहिली ते सातवी PDF अभ्यास अपडेट होत आहे.

Wednesday, July 3, 2019

अन् बदली झाली...


सन २०११ साली माझ्या शिक्षकी सेवेची सुरवात शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाच्या परिसरात डोंगरकपारीत वसलेल्या ढाणकेवाडी गावात झाली. ढाणकेवाडी शाळेत हजर झाल्यानंतर माझे पार्टनर(अरुण पवार), गावकरी व विद्यार्थ्यांसमवेत रममाण व्हायला मला वेळ लागला नाही. कारण सुंदर हिरवाईनं नटलेलं गाव व वातावरण माझ्या गावच्यासारखंच वाटत होतं.शाळा म्हटलं की शिक्षक, विद्यार्थी व पालक या त्रिसूत्री चा संगम ज्ञात व्हायला मला काही महिने लागले. ढाणकेवाडी गावातील प्रत्येक घरातील लोकांना, त्यांच्या अनुभवांना, त्यांच्या अपेक्षांना जाणून घेतले व शाळेचा कायापालट करण्यास आम्ही दोघांनी सुरवात केली. इमारत नुकतीच नवीन झाली होती. त्यामुळे शाळेचे बाह्यांग व अंतरंग बदलण्याचे ठरवले.व्यवस्थापन मिटींग घेऊन प्रत्येक गावातील सदस्यांनी आपल्या इच्छेप्रमाणे ५००,१०००,२००० अशी वर्गणी देण्यास सुरुवात केली.मुलांच्या कलांना वाव देण्यासाठी गॅदरींग चा कार्यक्रम केला. छोटय़ा वाडीत या कार्यक्रमातून १३,५०० रक्कम जमा झाली व शाळेचे बाह्यांग व अंतरंग लोकवर्गणीतून आम्ही बदलवून टाकले. टप्प्याटप्प्याने भौतिक सुविधा पूर्ण होत गेल्या. दोन्ही वर्गात डिजिटल क्लासरुम तयार झाल्या.
     शाळा सुरू झाली की काही मुले शाळेत येत नव्हती. त्यांना घरी जाऊन आणावे लागत असे. यातूनच 'आनंददायी शिक्षण' या संकल्पनेनं जन्म घेतला व शालेय वातावरणात विद्यार्थीअनुकूल करण्यासाठी नवनवीन उपक्रम व प्रयोग सुरू केले. संगीत कलेची मला आवड असल्याने गावकऱ्यांनी त्यांच्या भजनी मंडळाचे साहित्य शाळेत वापरायला दिले. पहिल्याच वर्षी तालुक्यापर्यंत मुले गायन व इतर स्पर्धेत चमकली.त्यानंतर प्रत्येक वर्षी तालुका जिल्हा स्तरावर मुलांनी गायन स्पर्धेत यश मिळविले. वक्तृत्व कलेतही मुलांनी यश मिळविले.
     सुरवातीला मी गावापासून ७ किमी अंतरावर चरण गावी राहत होतो. त्यावेळी प्रवासासाठी स्वतःची गाडी नव्हती.पार्टनर च्या गाडीवरुन किंवा बसने जायचो. पण तीन वर्षानी मी त्या वाडीत राहण्याचा निर्णय घेतला अन् तो निर्णय माझं आयुष्य बदलवून गेला. विष्णू गायकवाड काका या दिलदार माणसाने आपले घर माझ्या ताब्यात दिले. विशेष म्हणजे आतापर्यंत त्यांनी माझ्याकडून घरभाडे एक रुपयाही घेतला नाही. कारण ती सारी लोकं माझ्या कुटुंबातील घटकच बनून गेली.मी जेवण स्वतः बनवून खायचो. तांदूळ देखील मला तेथील माणसे द्यायची. ऋषिकेश च्या घरच्यांनी,शाळेबाजूचे रामचंद्र आण्णांनी मला सुरवातीला खूप सपोर्ट दिला.नंतर ढाणकेवाडी तील प्रत्येक घरातील माणसांची माणुसकी मिळवत गेलो. त्यांच्या सुखदुःखात अडीअडचणीत सहभागी होत होतो. माझ्या गाडीवरुन लोकांना गॅसच्या टाक्या आणून देताना, गॅस जोडताना कशाचीही लाज बाळगली नाही.लोकांच्या विश्वासाला कधीच तडा दिला नाही.
     सकाळी झोपेतून उठतो न उठतो तोपर्यंत मुले अभ्यासासाठी घरी हजर असायची. दिवसभर शाळा झाल्यानंतर पुन्हा सायंकाळी घरी सर्व मुले हजर असायची. मला संगीत ची आवड असल्याने याच मुलांच्या आवाजात सायंकाळी कविता रेकॉर्डिंग करून त्यांचा आवाज महाराष्ट्रभर पोहचवला. संगणक व तंत्रज्ञान ची आवड जोपासत या सर्व कविता आॅफलाईन अॅप च्या माध्यमातून महाराष्ट्रभर झळकल्या.सध्या लाखो विद्यार्थी या कविता ऐकत आहेत. विद्यार्थी सहभाग घेऊन शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती केली.मुलांना शिष्यवृत्ती परीक्षेत ही झळकवले.
     पहिली ते सातवी साठी उपयुक्त शैक्षणिक साहित्य सायंकाळच्या वेळेत बनवायचो.या आठ वर्षात इतके ई साहित्य निर्माण केले की, यातून माझी दखल जिल्हा, राज्यातील अधिकारी यांनी माझ्या कामातून घेतली. व्हिडीओ इडिटींग पाहून एक्स्टेप पोर्टलवर ई-साहित्य निर्मिती साठी निवड झाली.अनेक कार्यशाळा अटेंड केल्या.त्या पोर्टलवर घटक बनवले. सध्या राज्य शासनाच्या दिक्षा अॅप मध्ये हे घटक समाविष्ट आहेत.
     सुरवातीला प्रशासनाचे शाळेकडे लक्ष नव्हते. पण गटशिक्षणाधिकारी मा. मंद्रुपकर साहेब एके दिवशी मुद्दामहून शाळा व्हिजिट करावयास आले, त्यावेळी डोंगरभागात फुलवलेले शाळेचं रुप, विविध उपक्रम व मुलांचे कलागुण पाहून त्यांनी तात्काळ अभिनंदनाची पत्रे आम्हा दोघांना दिली व हा आगळावेगळा क्षण त्यांच्या आयुष्यातील पहिलाच होता. सर्व केंद्रप्रमुखांना आमच्या शाळेला भेटी देण्यास सांगितले..नंतर तालुक्यातील अनेक शाळेतील शिक्षक व व्यवस्थापन कमिटींनी शाळेस भेटी दिल्या. कमी पटातील शाळेतदेखील आम्ही पाॅझिटिव्ह दृष्टीने काम करत होतो व यशही मिळाले. अनेक तंत्रस्नेही कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शकाची भुमिका घेऊन अनेक शिक्षकांना तंत्रज्ञानाचे धडे दिले.
      माझ्या उपक्रम ची दखल शासनाने घेत २०१६ साली 'शिक्षणाची वारी'  उपक्रमसाठी निवड झाली. पूणे, औरंगाबाद व नागपूर ला महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील शिक्षकांना माझी कला दाखवता आली, शैक्षणिक साहित्य महाराष्ट्रभर पसरले.शिक्षणाची वारीची दोन गीते लिहिली व संगितबद्ध केली. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील जवळपास सव्वा चारशे व्हाॅट्सप गृप च्या माध्यमातून माझे शैक्षणिक अपडेट 'गुरुमाऊली' पोस्ट च्या नावाने शेअर करत आहे.
     लेझीम लघुचित्रपटला राष्ट्रीय पुरस्कार भोपाळ येथे मिळालेला क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. कारण सत्य स्टोरी मांडल्यानंतर हजारो लोकांच्या आलेल्या प्रतिक्रिया ढाणकेवाडी गावातील लोकांना भारावणाऱ्या होत्या. ओमला पाहण्यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ातून व्हिडीओ काॅल होऊ लागले अन् त्याचेही आयुष्य बदलून गेले. ढाणकेवाडी ची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मला जे यश मिळाले ते माझ्यासाठी अविस्मरणीय होते.
     हे सारे करत असताना कोणतीही फाईल न देता मला राज्यस्तरीय सात पुरस्कार मिळाले. ICT नॅशनल अवॉर्ड च्या फायनल मुलाखतीसाठी दिल्लीपर्यंत गेलो. पहिला विमान प्रवासाचे स्वप्न साकार झाले.विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत जिल्ह्य़ातही यश मिळाले.हे सारे करत असताना माझे दैवत म्हणून माझी सारी मुले माझ्या प्रत्येक यशाचे हक्कदार होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांपुढे माझे सारे पुरस्कार फिके आहेत.
     मुलांचे धाडस वाढविण्यासाठी लेझीम पथक चे अनेक भाग बसवून अनेक गावांमध्ये सुट्टी च्या वेळी कार्यक्रम केले. मिळालेले पैसे मुलांसाठीच खर्च केले. गायन कला जोपासत बालभजनीमंडळ तयार करुन आजपर्यंत शेकडो कार्यक्रम अनेक भागात केले. ही मुले भविष्यात नक्कीच आपले उज्ज्वल आयुष्य साकारतील. यासाठी पालकांनी सोबत राहून जो माझ्यावर विश्वास दाखवला, त्यास तोड नव्हती.
     सध्या मागील काही महिने यशदा येथे जलसाक्षरता अंतर्गत 'आपलं पाणी' पुस्तक लेखन साठी तज्ञ लेखक म्हणून माझी निवड झाली. मी माझे योगदान ही दिले. लवकरच महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत ही पुस्तके असतील.मला मिळालेल्या प्रत्येक संधीचे मी सोनं केलं. यापुढेही करेन. पण ढाणकेवाडी हे गाव माझ्या आयुष्यपटलावर नेहमी सर्वोच्चस्थानी राहील.
     आठ वर्षांच्या कालावधीत मला लाडके केंद्रप्रमुख मा. घोडे साहेब मिळाले. त्यांच्या स्वभावातील अनेक पैलू मी हेरले. प्रत्येकवेळी त्यांनी मला सपोर्ट दिला. तालुक्यातील BRC टीम व गुरुमित्र यांच्या सान्निध्यात काम करताना अनेक अनुभवांची शिदोरी मिळाली. अधिकारी व पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्या सहवासात माणुसकीचा झरा वाहत होता. त्यांचे आशीर्वाद माझ्या सोबत आहेत.
     लिहिण्यासारखे खूप आहे पण अनुभव न संपणारे आहेत.व्यवस्थापन कमिटी,भाष्टे सर, पोलीस पाटील तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्तींसोबत काम करताना 'राजकारण' या शब्दाला कधीच जवळ केले नाही. अन् याच गोष्टीमुळे  ढाणकेवाडी ची वेगळी ओळख निर्माण करण्यात यश मिळाले.लाडक्या बालचमुंचे चेहरे, जीवलग भावासारखे वाडीतील मित्र, आईसमान माझ्या सर्व मावश्या, थोरांची आपुलकी व वयस्कर माणसांचे प्रेम मला सतत आठवत राहील. माझ्या लेझीम फिल्ममधुन ढाणकेवाडी गावच्या आठवणी घेऊन जात आहे.
*_ प्रwin डाकरे* प्राथ. शिक्षक ढाणकेवाडी ता. शिराळा
नवीन शाळा - जि. प. शाळा कुंडलवाडी ता. वाळवा

No comments:

Post a Comment

Featured Post

दुसरी गणित ऑनलाईन टेस्ट क्र. १७.वजाबाकीने कमी करूया

दुसरी प्रज्ञाशोध परीक्षा व घटक सरावाच्या दृष्टीने प्रस्तुत सराव टेस्ट खूप महत्त्वाची आहे. या प्रश्नपत्रिकेची अभ्यासपूर्ण निर्मिती केलेली ...

Popular Posts

ऑनलाईन टेस्ट बाबत आपल्या प्रतिक्रिया वरील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा.